औंढा नागनाथ (हिंगोली) - येथील पद्मावती शिवारात शेतातील विहिरीत एका तरुण शेतकऱ्याचा शुक्रवारी (दि. 20 नोव्हेंबर) मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबरोबर काढला तर मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता. विहिरीचे पाणी पिकाला घेण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे स्पष्ट झाले. कायमचा काटा काढण्यासाठीच भावाने संपविल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तपासाची चक्रे गतीने फिरवून पळून जाणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मुलाचा आधार घेऊन खून केल्याची कबुली मृताच्या भावाने दिली.
राजू रखमाजी वाट (रा. जिरे माळीवला, औंढा नागनाथ), असे आरोपी भावाचे नाव आहे. आरोपी राजू व मृत भाऊ रवी रखमाजी वाट (वय 45 वर्षे) यांच्यात वडिलोपार्जित विहिरीचे पाणी देवाण-घेवाणीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. अनेकदा कडाक्याचे भांडणदेखील झाले होते. लोकांनी समजूत घालून दोघा भावांचे वाद मिटविण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न केले होते. मात्र, पिकाला पाणी देण्याच्या कारणावरून हे वाद दर वर्षीच उद्भवत असत. तो या वर्षी अति टोकाला गेला. रवी वाट हे 19 नोव्हेंबरला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. ते सकाळी बराच वेळ होऊन ही घरी न परतल्याने, नातेवाइकांनी शेतात जाऊन पाहणी केली तर सामाईक विहिरीत रवी वाट यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे व औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांची तयार केलेली टीम घटनास्थळी पोहोचली.
या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव
सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची अतिबारकाईने माहिती घेतली व तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तर मृताचा भाऊ राजू वाट हा हिंगोली ते वाशिममार्गे प्रवास करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या दिशेने धाव घेऊन, राजू वाट यास प्रवासा दरम्यान, तात्काळ ताब्यात घेतले.
आरोपीने दिली खुनाची कबुली
पथकाने राजू वाट यास ताब्यात घेतल्यानंतर त्याला विश्वासात घेतले. तर मी व माझ्या दोन मुले गणेश व आदिनाथ, असे आम्ही तिघांनी मिळून भाऊ रवी वाट यांचा डोक्यात मारून खून केला व आपल्यावर संशय न येऊ देण्यासाठी विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली.
आरोपीला केले पोलिसांच्या हवाली
मुख्य आरोपी असलेल्या राजू रखमाजी वाट व त्याची दोन मुले या सर्वांना ताब्यात घेऊन, औंढा नागनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले. विहिरीच्या पाण्यावरून उद्भवलेला वाद अखेर पाण्याजवळच मिटला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.