हिंगोली - जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत आहे. आदल्या दिवशी 22 तर लगेच दुसऱ्या दिवशी 14 जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 90 वर पोहोचल्याने जिल्हा हा शतकाच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत 83 जवानांना कोरोनाची लागण झालेली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाबाधित रुग्णाचे आकडे हैराण करून सोडत आहेत. त्याच धर्तीवर आता हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही हिंगोलीकरांच्या चिंतेत भर टाकत आहे. आधी 22 जवानांना तर लगेच आज 14 जवानांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करत असलेल्या एका 24 वर्षीय परिचारिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जवानांच्या पाठोपाठ आता रात्रंदिवस राबणाऱ्या परिचारिका व डॉक्टरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिचारिका राहत असलेला भाग केला सील
कोरोनाबाधित परिचारिका राहत असलेला रिसाला बाजार भाग हा पूर्णपणे सील केला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिसाला बाजार भागातील आठ गल्ल्या सील केल्या आहेत. शिवाय या भागात पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस बंदोबस्त देखील वाढवला आहे.