हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावात गरोदर मातांना बाजेवर टाकत चिखलमय रस्ता तुडवून रुग्णवाहिकेतपर्यंत पोहोचवल्याच्या काही घटना घडल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षाने प्रस्तुती झालेल्या त्या मातांच्या बाळांचा गुरुवारी मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला.
करवाडी येथील या गरोदर मातांची प्रसुती न विसरणारी आहे. मोठा संघर्ष केल्यानंतर त्या मातांची सुखरूपपणे शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यामुळे कळवाडी येथे मोठ्या उत्साहात त्या बालकांचा नामकरण सोहळा पार पडला.
अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी करवाडी या गावापर्यंत पायी जाण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र त्यांना देखील साफ अपयश आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मात्र धाडस करून या गावांमध्ये चिखलातूनच प्रवेश केला होता. त्यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात आश्वासने देत शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.
वरिष्ठ स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू असल्या तरी अजूनही या रस्त्याला मुहूर्त लागलेला नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. मोठ्या संघर्षमय परिस्थितीतून जन्मास आलेल्या त्या चिमुकल्यांची नावे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. संघर्ष, क्रांती, वीरांगना आणि नेहा अशी त्या बालकांची नावे ठेवण्यात आली आहेत.