हिंगोली - भाजप सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर या विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लीम बांधवांनी बंद पाळला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत या विधेयकाचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक पारित केले आहे. तर आता या विधेयकावर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच विधेयकाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले होते. शुक्रवारी सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लीम समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी देऊ नये, कारण मंजूरी दिल्यास देशात अराजकता माजेल. केंद्र सरकार मुस्लीम समुहाला लक्ष करीत असून, पुन्हा फाळणीची परिस्थिती निर्माण होईल असे म्हणत मुस्लीम बांधवांनी सरकारवर निशाणा साधला. धर्माच्या आधारावर कोणतीही नागरिकता नाकारणे असंवैधानीक असल्याचे यावेळी सांगितले जात होते. राष्ट्रपतींनी जर या विधेयकाला मंजुरी दिली तर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार असून, हा दिवस काळा दिवस ठरणार, देश या विधेयकामुळे ५० वर्ष मागे जाईल असा धोका ही व्यक्त करण्यात आला. आगामी काळात असहकार आंदोलनाचा इशारा देखील समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.