हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे रसवंती चालकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज बुधवार(दि. 6 एप्रिल)रोजी तो येथे राहत असलेल्या किरायाच्या घरात घडली आहे. (Murder Of Raswanti Driver ) लादूलाल तेली (रा. भिलवाडा राजस्थान) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रसवंतीचा दिवसभर व्यवसाय केला - मयत लादूलाल तेली हे मागील चार ते पाच वर्षापासून गोरेगाव येथे येऊन रसवंतीचा व्यवसाय करतात. त्यांनी बस स्थानक परिसरात रसवंतीचे दुकान उभारले आहे. तर, रसवंती लगतच एक खोली घेऊन ते आपल्या एका सहकाऱ्यांसह त्यामध्ये वास्तव्यास होते. त्यांनी रसवंतीचा दिवसभर व्यवसाय केला आणि रात्रीच्या वेळेस सरस्वती बंद करून ते आपल्या खोलीवर गेले होते.
कोणीही मदतीसाठी धावून आले नाही - लादूलाल यांनी रात्रीचे जेवण केले आणि ते झोपले होते. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्या घरात प्रवेश केला अन् लोखंडी सराटा अन् लाकडी दांड्याने लादूलाल यांना मारहाण केली. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या सहकार्याने खूप आरडा-ओरडा केला. मात्र, कोणीही मदतीसाठी धावून आले नाही. यामध्ये लादूलाल यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तोपर्यंत मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
घटनास्थळी पोलिसांनी घेतली धाव - घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव पाटील, जमादार गजानन बेडगे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. लोखंडी सराटा व लाकडी दांडा त्यांनी ताब्यात घेतला. घटनेची माहिती वरिष्ठांना देताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हर शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.
श्वान पथकाला केले पाचारण - घटनास्थळी पुढील तपासासाठी पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु, शान हे जागेवरच घुटमळले. त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध लागू शकला नाही. परंतु, घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. जेणेकरून मारेकरी या सीसीटीव्हीमध्ये कैद असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत अल्टिमेट! मुंबई उच्च न्यायालया निर्णय