हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातही गोर गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीसाठी अनेकजण धावून येत आहेत. मदत करताना कोणीही फोटोसेशन करु नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही फोटोसेशनला ब्रेक बसला नसल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या फोटोसेशनमुळे दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनी स्वतःला घरात कोंडून ठेवले आहे. हाताला काम नसल्याने अनेक लोकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर पुढे आले आहेत. मात्र, मदत करताना फोटो काढत असल्याने मदत घेणाऱ्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांसह गोरगरिबांना आवर्जून मदत करा असे आवाहन केले आहे. मात्र, त्याचे अजिबात फोटोशेसन करू नका, असे सांगितले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेशही 2 दिवसांपूर्वी काढले आहेत.
हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे पालन केले नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत मदत वाटप करताना फोटोसेशन केले आहे. तसेच नियमांचे पालन न करता ताफ्यासह हजेरी लावली. गेल्या 8 दिवसांपासून वसमत तालुक्यातील विविध गावात मदत वाटप कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मदत वाटप कार्यक्रमात खासदार ताफ्यासह पोहोचले. या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील यांच्यासह वसमत नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, बाजार समिती सभापती राजेश इंगोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अन लाभार्थ्यांनी आपत्कालीन कायद्याचे नियम मोडले. यावेळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हेही व्यासपीठावर होते. बराच वेळ कार्यक्रम सुरू असला तरी कोणतेही पथक या ठिकाणी फिरकले नाही. त्यामुळे शासन सर्वसामान्य नागरिकांना वेगळा आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय देते का? असा सवाल उपस्थित होत आहे. आता प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.