हिंगोली - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका मातेने आपल्या ३ मुलांच्या जेवणात किडे मारण्याचे औषध कालवून त्यांना मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंगोली शहरातील आजम कॉलनी भागात घडली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या मायलेकरांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मात्र संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अनिता मुंजाजी जगताप (३२), वैष्णवी जगताप (१७), साईनाथ जगताप (१४) आणि अनिकेत जगताप (१२) असे उपचार घेत असलेल्या मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची मनस्थिती बरोबर नसून, ती कोणावरही धावत असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत या कुटुंबाची भेट घेतली.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा पती मुंजाजी जगताप हे सेवकाचे काम करत असून, त्यांना अनेक दिवसांपासून दारुचे व्यसन जडलेले आहे. त्यांच्या पत्नीने अनेकदा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंजाजी यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. दारुच्या व्यसनावरुन पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. पण बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि या महिलेने रागाच्या भरात घरात मुंग्या मरण्यासाठी ठेवलेला खडूच जेवणामध्ये कालवून मुलांना खाऊ घातला आणि स्वतः देखील हे अन्न खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्याना उलट्या सुरू झाल्या, त्यामुळे त्याना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले मात्र, पुढील उपचारासाठी पैसे अपुरे पडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी सध्या या कुटुंबावर उपचार सुरू आहेत.
पतीच्या त्रासाला कंटाळून आईने आपल्या पोटच्या गोळ्याला विष देत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, ही बाब वेळीच शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी या माय-लेकरांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने सर्वांचे जीव वाचले. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. पोटच्या मुलांना जीव मारुन, स्वतः ही आत्महत्या करण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. ८ दिवसांपूर्वीच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव येथील एका निर्दयी मातेने स्वतःच्या २ चिमुकल्यांना गळफास लावून स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेला ८ दिवस उलटत नाहीत, तोच असा प्रकार पुन्हा घडला आहे. त्यामुळे यावर आवर घालणे महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.