हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर एक पेक्षा अधिक नागरिक एकत्रित येणार नाहीत यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, या कायद्याची तमा न बाळगता शाहीन बाग येथील सीएए व एनआरसी कायद्याविरुद्ध शशिभूषण समद पांडे यांना बोलावून शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे, ज्ञानदेव सखाराम घुगे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सभेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख निहाल अहेमद, शेख नफिज शेख लाल, शेख नेईम शेख लाल, जमीर भाई पानपट्टीवाले, शेख शकील मौलाना, शेख कदीर मौलाना, शेख इरफान, शेख नोमान शेख नईम व इतर २५० ते ३५० आरोपींचा सदर गुन्ह्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच साथीचा रोग पसरलेला असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार धार्मिक सांस्कृतिक व इतर सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरातील काही व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करता शहरात एनआरसीविरुद्ध जाहीर सभेचे आयोजन केले. त्यामुळे, वर उल्लेख केलेल्या सर्व आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी देखील सदर आंदोलनावेळी गैरकृत्य घडल्याने कही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पांडे करत आहे.
हेही वाचा- हिंगोलीत डेंग्यूने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; परिसरात खळबळ