हिंगोली- कोरोनामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी लागू असून जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद आहेत. अशा परिस्थिती दुसऱ्या जिल्ह्यातील रोजंदार हिंगोलीच्या काना कोपऱ्यात दडलेले आहेत. त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता त्यासाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे धावून आले आहेत. एका दोन दिवसासाठी नव्हे, तर लॉकडाऊन संपेपर्यंत ते भोजन पुरवणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्यावर न येण्याचा प्रशासनाचा आदेश बहुतांश सर्वजण पाळतच आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील काही कुटुंब शहरात अडकून पडले आहेत. तसेच रस्त्यावर भीक मागून पोट भरणाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. अनेकजण त्यांच्या मदतीसाठी धावून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी अशाच गरजू लोकांना तांदूळ, पीठाचे वाटप केले होते. आज आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत भोजनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे शहरातील भिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना भोजन दिले जाणार आहे. या उपक्रमात अनेकजण सहभागी झाले आहेत. आमदारांच्या पुढाकाराने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.