हिंगोली - परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे ऐन दुर्गा महोत्सवाच्या तोंडावर फुलांचा चिखल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हिंगोली तालुक्यातील सवड या गावात हे चित्र पाहावयास मिळाले आहे. प्रकाश जोजार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फटका फसला आहे.
प्रकाश जोजार यांनी याही वर्षी दोन एकरमध्ये झेंडूची लागवड केली. त्याच्यावर सुरुवातीपासून ते आतापर्यंत 40-50 हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. दरवर्षी, झेंडू विक्रीतून जोजार यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न होते. यातून 50 हजार रुपये खर्च वजा जाता एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या झेंडूच्या फुलांचा सतत सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरश: चिखल झाला आहे. तर नियमित सुरू असलेल्या पावसाने झेंडूवर करप्या रोग पडला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले ही करपून गेलेली आहेत. फुले तोडण्यासाठी त्यांना मजुरांवर दररोज तीन हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, झेंडूची फुले ही भिजलेली असल्याने त्यांना बाजारात योग्य भाव मिळेल की नाही? याची चिंता सतावत आहेत.
हिंगोली येथे झेंडूच्या फुलाला तेवढी मागणी नसल्याने, जोजार यांनी फुले हैदराबादला विक्रीसाठी नेण्याची तयारी दर्शवली आहे. त्या ठिकाणीही फुले विक्रीसाठी घेऊन जाताना दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येणार आहे. तेथेही फुलाला योग्य भाव मिळेल की नाही? हा प्रश्न आहे. तरीही मोठ्या धाडसाने जोजार हे हैदराबाद-नागपूर याठिकाणी फुले विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत. तेथे 60 रुपये प्रति किलो भाव मिळेल, अशी अपेक्षा जोजार यांनी व्यक्त केली आहे.
हिंगोली जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टीचा कहर झाला आहे. यामध्ये खरीप हंगामातील सर्वच पिकेही पाण्याखाली गेली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध भागात, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी झेंडूची फुले तोडणे सोडून दिली आहे. तर सोयाबीनही पाण्यात गेले आहे. अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला निसर्गानेही हतबल करून सोडले आहे. त्यामुळे यावर्षी निश्चितच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासन स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पदारामध्ये नुकसान भरपाई टाकावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.