मणिपूर : मणिपूरमधील जिरीबाम भागात सोमवारी (11 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास झालेल्या चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं. दरम्यान, परिसरात सैन्य दलाकडून शोध मोहीम राबविली जात आहे. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही गंभीर जखमी झाला. याबाबतचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलं. शांतता राखण्याचं आवाहन सुरक्षा दलाकडून करण्यात येत आहे.
'सीआरपीएफ'च्या कॅम्पवर हल्ला : समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता काही दहशतवाद्यांनी जिरीबाममधील बोरोबेकरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केला. या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यात 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
11 suspected militants killed in an encounter with CRPF in Jiribam area of Manipur. A CRPF personnel is also critically injured in the encounter: Sources pic.twitter.com/mDoJu2VA3y
— ANI (@ANI) November 11, 2024
दारूगोळा जप्त : दहशतवाद्यांकडून 4 एसएलआर (सेल्फ लोडिंग रायफल), 3 एके-47, एक आरपीजी (रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड) आणि इतर शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात शांतता : 133 व्या मणिपूर पोलिसांच्या स्थापना दिनाला उपस्थित राहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डीजीपी राजीव सिंह म्हणाले, "हा खूप आव्हानात्मक काळ आहे, परंतु आम्ही आमच्याकडे असलेल्या सर्वोत्तम ताकदीने आणि सर्वांच्या सहकार्याने सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत."
सुरक्षा दल सतर्क : "काही समस्या आहेत ज्या आम्ही लवकरच सोडवू कारण आम्हालाही राज्यात लवकरात लवकर शांतता आणि सामान्य स्थिती परत आणायची आहे. गेल्या दीड वर्षात परिस्थिती निश्चितच सुधारली आहे. गोळीबाराच्या तुरळक घटना घडत आहेत, परंतु सर्व सुरक्षा दल सतर्क आहेत आणि अनर्थ घडू नये यासाठी प्रत्येकजण कामावर आहे," असंही डीजीपी राजीव सिंह म्हणाले.
हेही वाचा