हिंगोली : तालुक्यातील जोडताळा येथे शेतात खुरपणीचे काम करण्यासाठी गेलेल्या वहिनीने इतर महिलांसोबत शेतात जेवण करत असताना, समोरून आलेल्या दिराला जेवणासाठी बोलावले. मात्र दिर जवळ गेला आणि त्याने थेट वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून वहिनीची हत्या केली. ही घटना आज(बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. सविता संजय जाधव (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, माधव असे आरोपीचे नाव आहे.
सविता आणि दिर रामेश्वर उर्फ माधव त्यांच्यामध्ये तीन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. या भांडणाचा राग माधव याने मनामध्ये धरला होता, तो बऱ्याच दिवसांपासून सविता यांच्यासोबत भांडण करत होता. मात्र, सविताचे कुटुंब तिला समजावून सांगत असल्याने, सविताही माधवच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे. तर, मुलांच्या भांडणावरून झालेल्या वादामुळे माधव जास्तच रागात आला होता. आज सविता इतर महिलांसोबत शेतामध्ये खुरपणीचे काम करण्यासाठी गेली होती. दरम्यान, दुपारी जेवणाची वेळ झाल्याने सर्व महिला एकत्र जेवायला बसल्या होत्या त्याचवेळी माधव तेथे आला. तेव्हा सविताने आदरपूर्वक माधवला जेवण करण्यासाठी बोलावले. मात्र, माधव सविताजवळ गेला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने लपवून नेलेल्या कुर्हाडीने सविताच्या डोक्यात सपासप वार केले. सविताच्या डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. माधवच्या डोक्यात एवढा राग होता की, सविता जमीनीवर कोसळल्यानंतरही त्याने तेथून निघून जाताना इतर महिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, अन् पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक रामेश्वर वजने बासंबा पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश मलपिल्लू, पीएसआय एस.बी. भोसले, सपोउनि मगन पवार सारिका राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बासंबा पोलीस ठाण्यात सुरू आहे.