हिंगोली - जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीची बैठक पार पडली. यामध्ये तीन पंचायत समितीवर महाविकास आघाडीचे तर एका पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. अन् वसमत पंचायत समितीवर भाजपची सता कायम राहिली आहे. सभापती, उपसभापतीच्या निवडीने जिल्ह्यात आप-आपल्या पक्षाच्या वतीने जल्लोष सुरू आहे. एकंदरीत सेनगाव, कळमनुरी, हिंगोली येथे महाविकास आघाडी तर वसमत येथे भाजप अन् औंढा नागनाथ येथे शिवसेनेची वर्णी लागली.
हेही वाचा- वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला
हिंगोली पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे तर उपसभापती काँग्रेसच्या गंगाबाई गावंडे यांची निवड झाली. तसेच वसमत येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या ज्योतीताई विश्वनाथ घोस, तर उपसभापती देखील भाजपच्याच विजय आण्णाराव नरवाडे यांची निवड झाली. औंढा नागनाथ समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या संगीता ढेकळे, तर उपसभापती पदीही शिवसेनेच्या भीमराव करडे यांची निवड झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या कळमनुरी येथील पंचायत समितीवर मात्र काँग्रेसचीच वर्णी लागली आहे. सभापतीपदी पंचफुलाबाई बेले तर उपसभापती मंजुषा राजगोरे यांची निवड झाली आहे.
वास्तविक पाहता याच पंचायत समितीमध्ये मागच्या निवडीच्या वेळेस वाद निर्माण झाला होता. या वेळेस हे पद काँगेसकडे गेले आहे. विशेष म्हणजे येथील सभापती, उपसभापतीची निवडही बिनविरोध झाली. निवडीसाठी काँग्रेसचे एकूण 13 सदस्य हजर होते. दोन्ही पदासाठी या ठिकाणी एक, एकच अर्ज आले होते. तर उपसभापती पदी मंजुषा राजगुरे यांची देखील बिनविरोध निवड झाली. एकूण संख्या पाहता काँग्रेसचे तेरा सेनेचे 6 अपक्ष 3 असे बलाबल पंचायत समिती कळमनुरी दिसून येते.
यापूर्वी अजय सावंत यांची उपसभापती पदी निवड झाली होती. मात्र, या वेळेस सेनेला आपला कुठलाच उमेदवार उतरविता आला नाही. त्यामुळे सभापती पदाच्या रूपात काँग्रेसचे वर्चस्व कायम दिसले. तसेच सेनगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशाताई गडदे यांची निवड झाली. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीमध्ये निवड झालेल्या सभापती, उपसभापतीचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. फटाके फोडून आप-आपल्या पक्षाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.