हिंगोली- पोलिसांची नजर चुकवून वाळूमाफिया सर्रासपणे मनमानी भाव लावत वाळूची विक्री करत होते. चोरट्या वाळू वाहतुकीवर पोलीस लक्ष ठेऊन होते. मात्र, हे वाळूमाफिया वारंवार गुंगारा देत वाळूची चोरी करत होते. स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत 4 ट्रॅक्टर ताब्यात घेऊन 22 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गनिमी काव्याने केलेल्या या कारवाईने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने चालक दिगंबर ग्यानदेव गंगावणे, मालक भरत गणेशराव नागरे दोघेही रा. खेड ता. कळमनुरी, चालक सुधीर गुलाबराव इंगळे रा. टाकळी, ट्रॅक्टर मालक आकाश जगन कांदे रा. खेड, चालक बाळू उर्फ विश्वजीत पाईकराव (रा. टाकळी), मालक महादेव लिंबाजी कांदे , चालक ज्ञानेश्वर अश्रुबा गोरे(दोघे रा. खेड) तर ट्रॅक्टर मालक पंजाब दत्तराव गीते या सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कळमनुरी हद्दीतील कळमनुरी ते खानापूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवपार्वती धाबा ते लासीना फाटा या भागात अवैध वाळूची वाहतूक सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भागात सापळा रचून ही वाहने जप्त केली आहेत. यातील काहीजण पळ काढण्याच्या तयारीत होते. मात्र,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात सर्वत्र तैनात होते.
वास्तविक पाहता गेल्या अनेक दिवसांपासून या भागात चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक होत होती. जागोजागी हे वाळूमाफिया दुचाकी घेऊन वाळू घेऊन येणाऱ्या ट्रकला सुरक्षित स्थळी पोहोचवत असतात. मात्र यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गनिमीकावा वापरून या वाळू माफियावर छापा टाकून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोटे, बालाजी बोके, शंकर जाधव, सुदाम लेकुळे आदींनी केली.