हिंगोली - लोकसभा निवडणूक पार पडल्यावर कोणताही राजकीय पक्ष हा आभार मानायला तुमच्या पर्यंत आला नाही. मात्र, तुम्ही आम्हाला जे प्रेम दिले, मदत दिली, त्यासाठी मी तुमचे आभार मानायला ही जनआशीर्वाद यात्रा थेट तुमच्या मध्ये घेऊन आल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. निवडणूक झाली की जनतेला राजकीय पक्ष विसरून जातात. मात्र, शिवसेना ही जनतेशी नाळ असलेली एक चळवळ आहे.
शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा शनिवारी वसमत येथे पोहोचली. अनेक राजकीय पक्ष हे निवडणुकीत यश मिळाले नाही तर जनतेला वाऱ्यावर सोडून देतात. मात्र, शिवसेना त्या राजकीय पक्षांसारखी खोटी आश्वासन देणारी तसेच जनतेला अर्ध्यावर सोडणारी नाही. तर शिवसेना जनतेसाठी किती तळमळीने काम करत आहे, हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्यावर निवडणुकीत जे प्रेम दाखवले त्या प्रेमाचे आभार मानायला ही यात्रा काढली आहे. मात्र, विरोधकांकडून ही यात्रा आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काढली आहे. असे अंदाज लावले जात आहेत. मात्र, ही यात्रा प्रचारासाठी अजिबात नाही. तर शिवसेना हा 365 दिवस 12 महिने 24 केवळ जनतेची कामे करणारा एकमेव पक्ष आहे.
मागील पाच वर्षांपासून दुष्काळ सुरू आहे. मात्र, सध्या काही प्रमाणात पाऊस आल्यामुळे आता काही काळ तरी शेतकऱ्यांना अडचण नाही. तर या दुष्काळी परिस्थितीमध्येही शिवसेना हा एकमेव पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, असे सांगत आदित्य यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
आदित्य यांची वृक्षतुला ही यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने तेवढा जनआशीर्वाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.