हिंगोली - लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीमध्ये संस्थाचालकांनी जादा शुल्क आकारू नये, असा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. मात्र, बरेच संस्थाचालक या शासन निर्णयाविरोधात उतरले असून हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे.
खाजगी शाळांनी पालकांकडून ज्यादा शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करु. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना कोणत्याही संस्थाचालकांनी शुल्क भरण्यासाठी तगादा न लावण्याच्या सूचना हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड दिल्या. मात्र, शुल्क माफ करण्याबाबत त्यांनी बोलणे टाळले.
कोरोनामुळे प्रत्येक जण हतबल झालेला आहे. या विदारक परिस्थितीमध्ये कोणत्याही पाल्यांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची खबरदारी प्रत्येक संस्थाचालकांनी घेणे गरजेचे आहे. पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना गायकवाड यांनी केल्या आहेत. या कठिण प्रसंगात शुल्क माफ करण्याची गरज आहे. मात्र, अशा वेळी शुल्क टप्प्यांनी भरण्यास सांगण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. कोरोनाने हतबल झालेल्या पालकांनी शुल्क भरायचे कसे, हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.