हिंगोली - शहरातील भाजी मंडई भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्यांना फळविक्रेत्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज सकाळपासून बंद पुकारण्यात आला आहे.
भाजी मंडईत काही फळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेचे पथक गेले होते. अतिक्रमण काढण्यावरून वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यावेळी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याचवेळी काम बंद ठेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. घडलेल्या प्रकारचे निवेदन दिले आणि शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतले. अजूनही पोलिसांकडून शोध मोहीम राबविली जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे फळविक्रेते स्वतःला वाचविण्यासाठी पळत सुटले आहेत.