हिंगोली - कोरोना महामारीच्या काळात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली. यामध्ये प्रशासन आणि आरोग्य प्रशासन फार खबरदारी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि कुरुंदा येथील मतदान केंद्रावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पीपीई किट घालून सुरक्षितरित्या मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून प्रशासनाच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात ही निवडणूक प्रक्रिया आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात फार खबरदारी घेतली गेली. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारी घेण्यात आली. जिल्ह्यातील 39 मतदान केंद्रावर आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रत्येक केंद्रावर मतदारांसाठी अवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. केंद्रांवर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर, टेम्प्रेचर गण, ऑक्सिमीटर देखील ठेवण्यात आले होते. त्यामुळे, कुठेही गैरसोय झाली नाही.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सेनगाव येथील कोविड रुग्णालयात दोन आणि वसमत येथील कोरोना वॉर्डमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह पदवीधर मतदार उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी वसमत उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी आणि हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवक कुमार कांबळे, अरविंद बोळगे यांच्याशी संपर्क साधला व मतदारांना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यास जाण्यासाठी आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सेनगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना पीपीई किट घालून तयार करण्यात आले व एका रुग्णवाहिकेने त्यांना मतदान केंद्रावर आणण्यात आले. दोन्ही रुग्णांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण
कोरोना पॉझिटिव्ह पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कर्मचारी गोंधळून जाऊ नयेत म्हणून सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्ण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले तेव्हा केंद्रावर शांतता होती.
हेही वाचा - हिंगोली : स्मशानभूमित जाणाऱ्या रस्त्यावर चिखल, नागरिक त्रस्त