हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी 14 दिवसांचे कडक लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे तळीरामांचा घशाला कोरड पडली. त्यांची 'गैरसोय' होऊ न देण्यासाठी दारू विक्रेते तयारी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पथकाने शहरातील जवळा-पळशी रस्त्यावरील खांबाळा शेत शिवारात छापा मारला. या कारवाईत देशी दारूचे एक लाख 96 हजार 80 रुपयांचे 12 बॉक्स ताब्यात घेऊन चार आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल गंगाराम वाघ, संतोष वसंतराव बगाटे, ए. एस. जैस्वाल(दुकान मालक), पी.एस.जैस्वाल (दुकान मालक) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपी वाघ आणि बगाटे हे रिक्षातून अवैध देशी दारूची वाहतूक करत असताना पथकाने वाहन थांबवून तपासणी केली. यावेळ देशी दारूच्या 12 बॉक्समध्ये
46 हजार 80 रुपयांच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच 1 लाख 50 हजार रुपयांची रिक्षा असा एकूण 1 लाख 96 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान मालकावर ही गुन्हा दाखल झाला आहे.
सबंधित कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि पोनी जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने केली आहे.