हिंगोली - चप्पल बूटांच्या नावाखाली डाक पार्सल करणाऱ्या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हट्टा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 52 गुटख्याच्या गोणी आढळून आल्या आहेत. त्याची किंमत 15 लाख 14 हजार 240 रुपये असून एकूण 10 हजार 816 पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. तसेच एकूण मुद्देमालाची किंमत 28 लाख 71 हजार 168 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोठ्या कारवाईने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मफियांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी सह पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय देवराव मडावी (वय- 55) चालक, कैलास शिवाजी कादबाने (मजूर) अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही पुण्यातील पुरंदर तालुक्याचे रहिवासी आहेत. त्याच्यासोबतच कंटेनर मालकावरही गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली, परभणी रस्त्यावरून एका कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्या यामार्फत मिळाली. त्यानुसार या मार्गावरील राहुल पाटील महाविद्यालयाजवळ डाक पार्सल करणाऱ्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मागील बाजूला चप्पल अन् बुटांच्या गोणी होत्या. त्याची झडती घेतल्यानंतर यामध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले. 52 गोणींमध्ये 15 लाख 14 हजार 240 रुपयांचे 10 हजार 816 पॉकेट आढळून आले, तर दुसऱ्या बॅगमध्ये 3 लाख 56 हजार 928 रुपयांची 10 हजार 816 पॅकेट अन् 10 लाख रुपये, असा 28 लाख 71 हजार 168 रुपांचा मुद्देमाल हट्टा पोलिसांनी जप्त केला आहे.