हिंगोली - सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथे शेती विक्री केल्याचा हिशोब देत नसल्याने आणि चारित्र्यावर संशय धरून दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून पतीने खून केला. ही घटना १६ सप्टेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी ज्ञानेश्वर शेषराव मुधवर यांच्या फिर्यादवरून आज (बुधवार) सेनगाव पोलीस ठाण्यात पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिसाचाच अत्याचार; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार
विठ्ठल उर्फ बाळू भीमराव गडदे, असे आरोपी पतीचे नाव आहे. तर कौशल्याबाई विठ्ठल गडदे असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपीला दोन पत्नी असून आरोपी हा पहिल्या पत्नी सोबत परभणी जिल्ह्यात राहतो. तर दुसरी पत्नी ही हत्ता येथेच राहत होती. दुसरे लग्न करण्यापूर्वी आरोपी पतीने ठरल्याप्रमाणे दुसऱ्या पत्नीच्या नावे दोन एकर शेती करून दिली होती. आरोपी पतीचे अधून मधून येणे जाणे सुरू होते. तर कौशल्याबाईने स्वतःच्या नावावर असलेल्या दोन एकर पैकी मुलीच्या लग्नासाठी एक एकर शेती विकली होती. विकलेल्या जमिनीचा का हिशोब देत नाहीस, असे म्हणत दोघांमध्ये जोराचा वाद झाला. आरोपीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत चारित्र्यावर संशय घेऊन गळा दाबून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत दूध आणण्याच्या बहाण्याने चिमुकलीला बोलावले घरात, शेजाऱ्याने केला बलात्कार
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर हे करत आहेत.
हेही वाचा - जामठी खुर्द परिसरात हरणाची शिकार; आरोपी अद्याप फरारच