हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार एवढा ढिसाळ झाला आहे की, वरिष्ठांचा जराही वचक राहिला नसल्याने गोंधळ वाढला आहे. वर्ग चारच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तर एका कर्मचाऱ्याचे सर्व्हिस बुक फाडल्याने त्याला ह्रदयविकाराचा झटकाही आला होता. त्याचा अहवाल सात दिवसात देण्याचे आश्वासन शल्यचिकित्सकानी दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही काहीच कारवाई नसल्याने आज (सोमवार) वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एवढा गोंधळ वाढला आहे, की या गोंधळाने कर्मचारीही चांगलेच गोंधळून गेले आहेत. वास्तविक पाहता वरिष्ठांचा जराही वचक राहिला नसल्याने वर्ग चारचे कर्मचारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मात्र, वेळ मारून नेण्यासाठी 'तुमच्या ज्या काही मागण्या आहेत' त्याची चौकशी करून त्याचा अहवाल ताबडतोब देण्याचे आश्वासन शल्यचिकित्सक किशोरीप्रसाद श्रीवास हे नेहमीच देत आलेत. तरीही अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. यालाच कंटाळून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात काम बंद आंदोलन केले.
याचा परिणाम रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असलेल्या रुग्णावर होत आहे. दिवसभर रुग्ण या ठिकाणी ताटकळत बसले होते, तर वरिष्ठ अधिकारी केवळ त्यांच्याच भांडणात तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना वर्ग चारचे कर्मचारी एवढे कंटाळून गेलेत की, कोणतीही कामे डॉक्टर वर्ग चारच्या कर्मचाऱ्याकडून करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी शिपाई भरती केली नसल्याने साफसफाईची कामे देखील वर्ग चारच्याच कर्मचाऱ्यावर करण्याची वेळ येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच डॉक्टर दमदाटी करत असल्याने कर्मचारी घाबरलेल्या स्थितीत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन महिन्यापूर्वी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, त्या समितीकडे अद्यापपर्यंत कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. यावरूनच स्पष्ट दिसून येते की, वरिष्ठांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात दुर्लक्ष असल्यानेच या बाबी घडतात. विशेष म्हणजे आज कामबंद आंदोलन असल्याची कल्पना शल्यचिकित्सक यांना असूनही ते हजर राहिले नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.