हिंगोली - जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या. एवढेच नाही, तर त्यांनी चारा छावणीत अतिशय साध्या पद्धतीचे जेवण करून रात्र काढली. हे सर्व खरे असले तरी जिल्ह्यात मुख्य असलेला चाऱ्याचा अन् पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यातच पालकमंत्र्याकडून पिण्याच्या पाण्यासह रेशनचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा ठेऊन बसलेल्या उमरा येथील महिलांना गावात आलेले पालकमंत्री साधे नजरेसही पडले नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या महिलांनी, पालकमंत्री असे आले अन् तसे गेले, असे म्हणत खंत व्यक्त केली.
हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री ऐन पाणीटंचाईत आपल्या गावाला भेट देणार म्हणजे आपल्या गावाचा पाणी प्रश्न निश्चितच सुटेल तसेच इतर अडचणीही मार्गी लागतील अशी अपेक्षा अनेक जण ठेऊन होते. अशात ज्या महिला उन्हाची जराही तमा न बाळगता उन्हात हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकतात त्या पालकमंत्र्याच्या प्रतीक्षेत मनामध्ये असंख्य प्रश्न ठेऊन दिवसभर थांबल्या होत्या. मात्र गावात पालकमंत्री कधी आले अन् कधी गेले याची जराही खबर महिलांना लागली नाही.
या गावात पाणी टंचाईची नेहमीच बोंब असते. दहा वर्षांपासून ही परिस्तिथी असल्याने पालकमंत्री यावर काही तरी पर्याय काढतील, अशी अपेक्षा ठेऊन असलेल्या महिलांना पालकमंत्री येणार असल्याची किंवा आल्याची जराही कल्पना दिली नाही. या दोन दिवसीय दौऱ्यात पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र यापैकी किती मागण्या पूर्ण झाल्यात हादेखील शोधाचाच विषय आहे. दुसऱ्या दिवशीही आश्वासन दिलेल्या बहुतांश गावांकडे अधिकारी कर्मचाऱ्यांने साधे ढुंकूनही न पाहिल्याने पालकमंत्र्यांना अधिकारी जुमानत नसल्याचे सर्वसामान्यातून बोलले जात आहे.