हिंगोली - आजकाल आपण इतरांसाठी, समाजासाठी काहीतरी करू, ही भावना लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण आपले काम आणि आपण यात गुंग आहे. मात्र, काही घटक याहून वेगळा विचार करून इतरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. असेच एक कार्य केले आहे, हिंगोली व्यापारी महासंघाने...
शहरातील गांधी चौक हा अतिवर्दळीचे ठिकाण आहे. येथे पोलिसांना नेहमी खडा पहारा द्यावा लागतो. मात्र, येथे पोलिसांना विश्रांतीसाठी काहीच सोय नव्हती. याची उणीव लक्षात घेऊन आणि पोलिसांचा त्रास कमी करण्यासाठी हिंगोली व्यापारी महासंघाच्या वतीने येथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. उत्स्फूर्तपणे समोर येऊन नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर छप्पर आणल्याने व्यापारी महासंघाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
या चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार गजाननराव घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, व्यापारी महासंघाचे धरमचंद वडेरा, कैलास काबरा, सोनी आदींची उपस्थिती होती.
हिंगोली शहरात गांधी चौक वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे या भागात नियमित पोलीस प्रशासनाचे कर्मचारी कर्तव्य बजावत असतात. त्यामुळेच हा भाग सुरक्षित मानला जातो. या भागातील वर्दळीमुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, जीवाची पर्वा न करता कर्मचारी आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळे व्यापारी महासंघाने पुढाकार घेत येथे एक पोलीस चौकी उभारून दिली. ही पोलीस चौकी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपयोगाची ठरणार आहे.
अजूनही शहरात तीन ठिकाणी पोलीस चौकीची मागणी आहे. तो प्रस्ताव मान्य करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी यावेळी सांगितले. 'आपणही समाजाचे काही देणे लागतो, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यापारी महासंघाने चौकी उभारण्याचा दाखवलेला पुढाकार हा खरोखरच पोलिसांना बळ देणारा ठरणारा आहे. अजून इतर ठिकाणी चौकी उभारण्यासाठी कोणी पुढे आले तर फायद्याचे होईल, असेयोगेश कुमार म्हणाले.
शहरामध्ये बंद पडलेले सीसीटीव्ही दुरुस्त करावेत, त्यासाठीही हवे तर व्यापारी महासंघ निधी देण्यास तयार असल्याचे माजी आमदार गजाननराव घुगे यांनी सांगितले.