हिंगोली - वाहतूक शाखेने वर्षभरात 80 लाख रुपये दंड वसूल केला आहे. 30 हजार 338 वाहनांवर कारवाया केल्या असून, जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करत आहेत. त्यामुळे वाहन चालक आपली वाहने सोडवून घेण्यासाठी वाहतूक शाखेत धाव घेत असल्याचे चित्र दिसते आहे.
शहरात नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी हिंगोलीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. येथील वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम वाहन धारकांना कळावेत यासाठी जनजागृती केली. यासाठी रस्ता सुरक्षा अभियान काटेकोरपणे राबवले. मात्र, ज्या बेशिस्त वाहन चालकांनी याला दाद दिली नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
हेही वाचा - दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण
पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू केली. सहायक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा धडाका लावला. पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई चालान मशीन, बॉडी कॅमेरे, वाहन कॅमेरे, अत्याधुनिक वाहन, टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या माध्यमातून वाहन चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल केली. यातून 80 लाख रुपये दंड जमा झाला आहे.
वाहन चालकांना चांगली शिस्त लागून अपघाताचे प्रमाणात कमी व्हावे, हा या कारवायांमागे उद्देश आहे, असे चिंचोळकर यांनी सांगितले. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.