हिंगोली - कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या मालेगाव येथून बंदोबस्तावरून आपल्या जिल्ह्यात परतलेल्या हिंगोली येथील राज्य राखीव दलातील तुकडीला चहा पाणी करणे हिंगोली जिल्ह्यातील साळणा येथील एका माजी सरपंचाला चांगलंच भोवलं आहे. चहा पाजलेल्या तुकडीतील जवानाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर चहा पान केलेल्या माजी सरपंचासह इतर चार जणांना ताब्यात घेत ओंढा नागनाथ येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
संपूर्ण जगभरात खळबळ उडविलेल्या कोरोनाचे हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्ड मध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्वच रुग्ण मुंबई अन् मालेगाव या ठिकाणी संचारबंदीत बंदोबस्त आटोपून आलेले आहेत. वास्तविक पाहता आपले आप्तजन किंवा मित्र पर जिल्ह्यातून येताना आपल्या गावावरून चालले तर जिव्हाळा वाटतोच. अशातच त्या मित्राला देखील रस्त्यावर प्रतीक्षा करीत बसलेल्या मित्राला भेटण्याची आस लागतेय. असाच काहीसा प्रकार मालेगाव येथून बंदोबस्त करून येणाऱ्या जवानाला भेटणाऱ्या साळणा येथील माजी सरपंचासह इतर चार जणाच्या बाबतीत घडला आहे.
जवान घेऊन येणारे वाहन साळणा फाट्यावर येताच मित्र पाहून माजी सरपंचासह गावातील तीन ते चार सहकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत तसेच स्वतःचे संरक्षण करत त्या जवानांना चहा पाणी केले.
हिंगोली येथे आल्यानंतर त्याना राज्य राखीव दलात होम कॉरनटाईन करुन आरोग्य तपासणी केल्यानंतर सहा जणांचा अहवाल हा कोरोना पॉजिटिव्ह आला. त्यामुळे या जवानांच्या संपर्कात आलेल्या माजी सरपंचासह त्यांच्या तीन ते चार मित्रांनाही आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन, ओंढा नागनाथ येथील भक्त निवासात क्वारंटाईन केले आहे. सध्या माजी सरपंचासह इतर मित्रांच्या औरंगाबाद येथून येणाऱ्या आरोग्य विभागाच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.