हिंगोली - नागपूर येथे एका आरोपीकडून हिंगोली पोलिसांनी आठ लाख रुपयांच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी अटकेतील मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशीने (देशमुख) दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे हिंगोली शहरातील बनावट नोटांचे जाळे विदर्भात पसरल्याचे समोर आले आहे.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंदनगर भागात एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या बनावट नोटांचा पर्दाफाश दहशतवाद विरोधातील पथकाने केला होता. यामधील मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशीकडून (देशमुख) रोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून, नागपूर येथे एका आरोपीकडून पथकांनी आठ लाख रुपयांच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा जप्त केल्या आहेत. या आरोपीला ताब्यात घेऊन मोबाइलचा सीडीआर तपासण्यात येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी एका आरोपीकडून चिल्ड्रन बँकेच्या एक लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चौकशीमध्ये घरातही नोटा ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून आरोपीच्या घरातून आणखी नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी आरोपीचे मोबाइल जप्त केले आहेत. आरोपीच्या मोबाइलमधील सीडीआरवरून संपर्कात असलेल्या इतरांचा शोध घेतला जाणार आहे.
बनावट नोटाचे प्रकरण विदर्भात गाजत आहे. मुख्य आरोपीचे सर्वाधिक संबंध हे विदर्भातील अनेकांसोबत असल्याचेही तपासात उघडकीस होत चालले आहे. या बनावट नोटा प्रकरणात अजून किती मासे गळाला लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर येथे पोलीस उपनिरीक्षक मनोज पांडे, गणेश लेकुळे व दिलीप बांगर हे पथक शोध मोहीम राबवित आहेत. या प्रकरणात पोलिसांनी ३३ लाख ४४ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.