हिंगोली - कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांना खूप मोठा फटका बसला आहे. सर्वांची रोजीरोटी अवंलबून असलेला कामधंदा बंद पडल्यामुळे कामगार कुटुंबीय आपआपल्या मायदेशी परत निघाले आहेत. त्यात सामान्यांसाठी वाहतूक बंद असल्यामुळे हे नागरिक पायी चालले आहे. हैदराबाद येथून जथ्थेच्या जथ्थे आपल्या घरी म्हणजे राजस्थानला निघाले आहेत. रस्त्याने साधी त्यांची विचारणा करण्यासाठी वाहन जवळ नेले तर ते खाण्यापिण्याची विनवणी करत आहेत. रस्त्यावर कोणी दिसले की, 'साब खाने को मिलेगा क्या, नही तो पाणी मिलेगा तो भी चलेगा' अशी केविलवाणी विनंती हे लोक करीत आहेत.
डोक्यावर आणि हातात सगळा संसार आणि लेकरं बाळ घेऊन हे लोक आपल्या गावी चक्क पायी निघाले आहेत. सूर्योदय झाला की मार्गस्थ व्हायचे आणि सूर्यास्त झालेल्या ठिकाणी मुक्काम करायचा, असा दिनक्रम सध्या या लोकांचा सुरू आहे. दिवसभर तहान भूक हरून गावाला जाण्याच्या ओढीने निघालेले हे कामगार रस्त्यावर कोणी दिसेल त्यांना मदत मागत आहेत.