हिंगोली - यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता सरपंचपदाचे राज्यस्तरावर जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तालुकानिहाय ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत कळवण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांची केली निवड
सेनगाव व हिंगोली तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची नेमणूक करण्यात आली असून सेनगाव तालुक्याची आरक्षण सोडत 9 नोव्हेंबर रोजी व हिंगोली तालुक्याची आरक्षण सोडत 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. वसमत व औंढा नागनाथ तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांची नेमणूक करण्यात आली असून वसमत तालुक्याचीही आरक्षण सोडत 9 नोव्हेंबर रोजी व औंढा नागनाथ तालुक्याची आरक्षण सोडत 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. तर, कळमनुरी तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची नेमणूक करण्यात आली असून, कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
आरक्षण वाटप
तालुकास्तरावर मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम 1964 नियम 2-अ (1)(2) अन्वये पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुकास्तरावर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आरक्षितपदाचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले आहे.
सरपंचपदाच्या आरक्षणाची (महिला पदासह) कार्यवाही करण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
योजनांची माहिती
उमेदवार पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या योजनांबद्दल ग्रामस्थांना माहिती देत आहेत तर योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी देखील स्वतःवर घेत आहेत. याचबरोबर गावातील अडीअडचणीचा देखील आढावा घेत आहेत.