हिंगोली - यावर्षी हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याचा फटका केवळ मानवालाच बसत नसून वन्य प्राणीही याचे शिकार झाले आहेत. तहानेने व्याकूळ झालेले वन्यप्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकताना जंगली भागात दिसून येत आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण जाणवत असल्याने, जीवापाड जपलेली गुरेही पशुपालक विक्रीस काढत आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे. दरवर्षी या जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण होते. आज घडीला जिल्ह्यात खासगी व सरकारी टँकरची संख्या ७० वर जाऊन पोहोचली आहे. बर्याच गावात तर पूर्णता जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे या गावाची तहान ही केवळ टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. अशा परिस्थितीत गुरांना चारा पाणी करणे पशुपालकांसमोर एक आव्हानच उभे ठाकले आहे. तसेच जंगली भागातील पानवटे देखील पूर्णता कोरडेठाण पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत गावापर्यंत पोहोचत असल्याचे भयंकर चित्र निर्माण झाले आहे.
पाणी आणि चारा टंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्यामुळे बऱ्याच गावातील पशुपालकांनी आपली गुरे विक्रीस काढली आहेत. आज हिंगोली येथील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे विक्रीस आली होती. गुरांच्या संख्येमुळे बाजाराची जागा देखील कमी पडत असल्याचे पहावयास मिळाले. पशु पालकांना गुरे विक्री संदर्भात विचारना केली तर, डोळ्यासमोर गुरे उपाशी ठेवणे योग्य वाटत नाही. म्हणूनच हा शेवटचा पर्याय समोर आल्याचे पशुपालक सांगत होते.
तर ज्या पशुपालकांकडे गुरे आहेत असे पशुपालक पाण्याच्या शोधात कितीतरी किमी अंतर कापत आहेत. ज्याप्रमाणे मानवाला पाणी टंचाईचा फटका बसत आहे. तसाच वन्यप्राण्यांना देखील बसत आहे. वनविभागाच्या वतीने मात्र वन्यप्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करून पानवठ्यात पाणी टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तरी कुठे काही प्रमाणात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. मात्र, भांडेगाव, कलगाव, माळहीवरा, जयपुवाडी, मालसेलू या भागात कुठेही पाण्याची व्यवस्था केली नसल्याने वानरे गावामध्ये प्रवेश करीत आहेत.