हिंगोली - जिल्ह्यात काहीही अडचण झाली, तर कोणीही ती सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यालयात धाव घेतोच. मात्र, तिथे गेल्यानंतर जर अधिकारी ही बाब आमच्या अधिपत्याखाली येत नाही, हे पद्धशीरपणे समजावून सांगत असतील तर जिल्हास्तरीय कार्यालये नेमकी आहेत तरी कशासाठी ? असाच प्रश्न समोर उभा राहतो. ओंढा नागनाथ येथे स्थलांतरित होत असलेल्या देशी दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यास आलेल्या नागरिकांनाही असाच प्रश्न पडला आहे.
हिंगोली जिल्ह्यात देशी दारूच्या दुकानांमुळे महिला अक्षरशः भांबावून गेलेल्या आहेत. कधी महिला व काही नागरिक दारूचे दुकान बंद करण्यासाठी राज्यउत्पादन शुल्क किंवा पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांना ही बाब आमच्या अधिपत्याखाली नसून आल्या पावली परत लावल्याचा प्रकार हिंगोली येथील राज्यउत्पादन शुल्क विभागात बुधवारी उघडकीस आला.
याठिकाणी वरिष्ठांनी गोळेगाव येथील दुकानाला ओंढा नागनाथ येथे स्थलांतरित करण्यासाठी कशी परवानगी दिली, असा सवाल केला. त्यामुळे आम्ही यात काहीही हस्तक्षेप करूच शकत नसल्याचे महिलांना व्यवस्थित समजून सांगितले जात होते. शिवाय याप्रकरणी अपिल करण्याचे सल्लेदेखील राज्यउत्पादन शुल्क विभागातून दिले गेले. त्यामुळे आता दारूचे दुकान बंद करण्यासाठी जिल्हा स्तरावर आलेल्या राज्यउत्पादन शुल्क विभागात धाव घेऊन काहीच उपयोग होत नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
ओंढा नागनाथ येथे हे दुकान स्थलांतरित केले तर महिला व विद्यार्थिनींना घराबाहेर पडणे चांगलेच अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे महिला गयावया करून हे दुकान रद्द करण्याची विनवणी अधिकाऱ्यांना करत होत्या. एवढेच नव्हे तर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. मात्र पद्धतशीर समजून सांगितले. आता प्रशासन यात काय लक्ष घालते, की अजून वरिष्ठांकडे धाव घ्यावी लागते, या बुचकळ्यात महिला व पुरुष पडले आहेत. मात्र, काम बुडवून दारूबंदी करण्यासाठी आलेल्या महिलांना अधिकाऱ्यांच्या उपदेशामुळे आल्या पावली घरी परतावे लागले.