हिंगोली- पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर हिंगोली येथे जिल्हा परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमात अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनमुराद आपल्या कला सादर केल्या. त्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तर 'चेहरा है या चांद खिला है' हे रोमँटिक गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
हिंगोली येथील महावीर भवन येथे समारोप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नेहमीच सुटा बुटात अन् कार्यालयात कामकाजासाठी व्यस्त असणारी अधिकारी कर्मचारी मंडळी, आपल्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला सादर करत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत होता. तर या सर्वांना आदेश फर्मावणारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हातात गिटार घेऊन गीत सादर करत असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. मात्र गिटार वाजवत गीत गाताना जिल्हाधिकाऱ्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. तर काही महिला कर्मचाऱ्यांनी बहारदार नृत्ये सादर केलीत.