हिंगोली - गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कंपनीच्या कामानिमित्त काही कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू झाल्याने हे कामगार अडकले. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी संपल्याने आता स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केलाय. या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच तपासणी करून त्यांची दोन बसमार्फत केरळला रवाना करण्यात आले. या पुढाकारामुळे परप्रांतीयांनी हिंगोलीकरांचे अन् प्रशासनाचे आभार मानले.
याआधी देखील कामगारांनी अनेकदा माघारी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,त्यांना नांदेडपासून परत हिंगोलीकडे पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था गायत्री शक्तिपीठ येथे करण्यात आली. यानंतर आज सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना गावी रवाना करण्यात आले.
यासाठी समाजसेवक दिलीप बांगर तसेच अजय कुमार वासुदेवन यांनी पुढाकार घेऊन कामगारांना आवश्यक मदत पुरवली. मजूरांनी रवाना होताना या समाजसेवकांसह हिंगोली प्रशासनाचे आभार मानले.