हिंगोली - बनावट नोटांच्या कारखान्यातील आरोपीचे राजकीय व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे समोर येत आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पांढरकवडा येथून प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला सोमवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विलास पवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे.
शहरातील आनंद नगर भागात बनावट नोटाच्या कारखान्यावर 3 सप्टेंबर रोजी दहशदवादविरोधी पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता मिळालेल्या माहितीवरून पथकाने पुसद येथून दोघांना ताब्यात घेतले. बनावट नोटा प्रकरणाचा दहशतवादविरोधी पथक सखोल तपास करत आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशीच्या (देशमुख) चौकशीत नवनवीन नावे पुढे येत आहेत. त्याचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबध असल्याचे दिसून येत आहे. त्याची पथकाकडून कसून चौकशी करून अन्य संशयितांना ताब्यात घेतले जात आहे.
प्रहारच्या जिल्हाध्यक्षावर फसवणुकीचे आहेत आरोप-
वणी येथून ताब्यात घेतलेला प्रहारचा जिल्हाध्यक्ष विलास पवार याच्यावर यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पवार हा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील रहिवासी आहे. तो मूळचा पांढरकवडा येथे स्थायिक झालेला आहे. वाळू तस्करी व सनदी लेखा परीक्षकाची 35 लाखांच्या फसवणूकीसह बनावट पदव्यांच्या प्रकरणातही पवार याचे नाव चर्चिले जात आहे.
प्रहारच्या जिल्हाध्यक्षाचा अजून तरी बनावट नोटा प्रकरणात थेट संबध आढळलेला नाही. मात्र, त्या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी केली जात आहे. मात्र प्रकरणाशी संबंध असण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांच्यासह पथकातील कर्मचारी करीत आहेत.