हिंगोली - जिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवसापासून पावसाची हजेरी सुरू आहे. अशा परिस्थितीत आज(गुरुवार) दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी हे मळणी यंत्रातून सोयाबीन काढून घेण्यामध्ये मग्न होते. मात्र, पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. गतीला आलेल्या कामांना ब्रेक लागल्यामुळे मजुरावर देखील उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
भारतीय हवामान खात्याने 17 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हवामान खात्याचा अंदाज हा खरा ठरला असून संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या स्वबळावर पूर्णपणे पाणी फिरले आहे. खरंतर अगोदरपासून सुरू असलेल्या पावसामुळे हातचे पिक गेले असले तरीही ते कापून घेण्यासाठी शेतकरी धडपडू लागला आहे. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी तर गुडघाभर पाण्यात सडत असलेला सोयाबीनदेखील कापून त्याची सुडी लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ह्या सुड्या पावसामुळे भिजल्या गेल्या, तर काही शेतकऱ्यांना शेतात कापून टाकलेले सोयाबीन गोळा करता आले नाही. त्यामुळे शेतात साचलेल्या पाण्यावर सोयाबीनच्या मुठी तरंगत असल्याचेही दिसून आले.
शेतात दिवसरात्र राबलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने अक्षरशः हैराण करून सोडले आहे. तसेच नुकतेच कोरडे झालेले अनेक भागातील रस्ते हे चिखलमय झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर हा कायम होता. त्यामुळे, रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे.