हिंगोली - भारतीय हवामान खात्याने 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये दुपारपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्यस्थितीत जिल्ह्यात सोयाबीन कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर वीज पडून कोथळज येथील एका म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले होते. तर, आज दुपारपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आधीच पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची या पावसामुळे दैना झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरूवात केली होती. मात्र, आज झालेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सोयाबीन कापणीला वेग आल्याने काही तरुणांनी या संधीचा फायदा करून घेतला आहे. जिल्ह्यातील सवना येथील युवकांनी एकत्र येत 'शिवशाही मंडळ' स्थापन केले आहे. हे मंडळ वेगाने सोयाबीन कापणी करत असल्याने, शेतकरी याच मंडळाला सोयाबीन कापणीसाठी देत आहेत. यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला असून हे मंडळ सामाजिक कार्यात देखील उत्साहाने सहभाग घेत आहे.
दिवसभर झालेल्या पावसामुळे, सोयाबीन कापणीचे काम अर्ध्यावर सोडून कापलेले सोयाबीन गोळा करून झाकून ठेवण्याची वेळ आली. शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत असून पाऊस न थांबल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
हेही वाचा - 'गुन्हे घडतच असतात, त्यांना मोदी रोखू शकत नाहीत' काँग्रेस नेत्याचे बेताल वक्तव्य