हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीच्या मशागतीकडे लक्ष घातले आहे. मात्र, समाधानकारक पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले आहे.
अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी आता स्वतःला सावरून शेतीच्या मशागतीसाठी प्रयत्न करत आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर सेनगाव परिसरात सलग 2 दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
तर आज (बुधवारी) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आता मशागतीच्या कामाबरोबरच हळदीची देखील लावगड करून घेत आहेत, तर काही शेतकरी हे खते बी-बियाणांच्या तयारीला लागले आहेत. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.