हिंगोली - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून अधूनमधून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी पावसाची असलेली प्रतीक्षा संपलेली आहे. मात्र, वापसा झालेल्या शेत शिवारात शेतकरी पेरणी करण्यात मग्न झाले आहेत.
पेरणी वेळेत आटोपण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा सहारा घेत आहेत. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र हे पेरणीयोग्य असून, दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. उर्वरित हेक्टरवर कापूस, मूग, उडीद हळद याची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे, सोयाबीनच्या पेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आता मात्र शेतकरी कृषी केंद्रावर खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.