हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील जांब ते शिंदगी या शेत शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा व इतर प्रकारचा 20 लाख 58 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. येथून 121 गोण्या गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
हेही वाचा - हिंगोली: कत्तलखाना उभारणीचे काम बंद करण्यासाठी महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा
जांब ते सिंदगी शिवारामध्ये शेतात असलेल्या 3 शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडार यांच्या पथकाने सिंदगी शिवारात 3 शेडवर छापा मारला. तेव्हा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याचे आढळून आले.
हेही वाचा - हिंगोलीत जोरदार पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा
एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या गुटख्यामुळे येथून जिल्हाभरात गुटखा पोहोचवला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा गुटखा कर्नाटकमधून येथे आणल्याची माहिती आहे. यापूर्वी हा गुटखा परभणी येथे साठवून ठेवला जात होता, तर आता हिंगोली जिल्ह्यातही अवैध पद्धतीने गुटखा साठवून ठेवल्याचे समोर आले आहे.
जप्त केलेला गुटखा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. तसेच शेत मालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात परभणी येथील अन्न व औषध प्रशासनास माहिती देण्यात आली आहे.