हिंगोली- जिल्ह्यात बुधवारी 14 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये दोन महिन्याच्या चिमुरडीसह एक वर्षाच्याही चिमुरड्याचाही समावेश आहे. तसेच एका महिलेला प्रसुतीनंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्हा हा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पुन्हा एकदा 14 रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 314 वर पोहोचली आहे. त्यापैकी 263 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील 60 वर्षीय पुरुष असून, सदर रुग्णाचा बाहेर जाऊन आल्याचा कोणताही पूर्व इतिहास नाही. हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंधारवाडी येथील क्वारंटाइन सेंटर येथे दाखल असलेल्या एका 32 वर्षीय महिला एक वर्षाच्या चिमुरड्याला कोरोनाची लागण झालेली आहे. हे दोघेजण हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरातील रहिवासी असून, नांदेड येथे उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील दौड येथील एका 25 वर्षीय महिलेचा अहवाल प्रसुतीपश्चात पॉझिटिव्ह आला आहे. या सोबतच एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. या दोघी जणी ही औरंगाबाद येथून आपल्या गावी परतलेल्या आहेत. लिंबाळा येथील क्वारंटाइन सेंटर येथे दाखल असलेल्या 6 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, यातील एक व्यक्ती हा हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथून गावात दाखल झाला होता. तर दुसरा भांडेगाव येथील रहिवासी असून तो देखील मुंबई येथून परतलेला आहे. इतर पाच जण हे कळमकोंडा येथील रहिवासी असून, हे सर्वजण औरंगाबाद येथील वाळुज या भागातून आपल्या गावी परतले आहेत.
ठाणे येथून परतलेल्या जोडप्याच्या एका 2 महिन्याच्या चिमुरडीला देखील कोरोनाची लागण झाली असून, हे कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील रहिवासी आहेत. सेनगाव तालुक्यातील वैतागवाडी येथील रहिवासी असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असून, दोघेही जण हे मुंबई येथून परतलेले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 314 वर पोहोचली आहे. तर 51 रुग्णांवर विविध कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आजघडीला 803 कोरोना संशयित क्वारंटाइन सेंटर मध्ये दाखल असून 249 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत.