हिंगोली - औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा जवानांपैकी चार जवानांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या दोन जवानांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे हिंगोलीतील वसमत येथे 10 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने हिंगोलीसह प्रशासनामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्य राखीव दलाच्या जवानांमध्ये कोरोना संसर्गाने जिल्हा हादरून गेला होता. मात्र प्रशासनाच्या नियोजनामुळे व आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे कोरोनाबाधित जवान हे बरे होत चालल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत मुंबई येथून परतलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे वसमत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तर दुसरीकडे मात्र मुंबई येथून परतलेल्या त्या रुग्णासोबत प्रवास केलेल्यांपैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हिंगोली तालुक्यातील भिरडा या गावी ग्रामस्थ चांगलेच हादरून गेले आहेत.
आज घडीला वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना अजून तरी कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ञ वैद्यकीय टीम मार्फत उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य प्रशासन जीवाची जराही पर्वा न करता कर्तव्य बजावत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होताना दिसून येतोय.
तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या -
जिल्ह्यातील आयसोलेशन वार्डमध्ये एकूण 1805 व्यक्तींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1494 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या पैकी 1478 व्यक्तींना सुटी देखील देण्यात आली आहे. 325 व्यक्ती सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असून त्यापैकी 272 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे.