हिंगोली- मालसेलू येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. हे शुद्धीकरण केंद्र मालसेलूतील माजी आमदार रामराव वडकुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आले आहे. मात्र, उद्घटना अभावी हे जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत माजी आमदार वडकूते यांनी मालसेलू येथील आपल्या कार्यकर्त्यांना उद्घाटनाविनाच जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे, मालसेलू ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे.
कोरोनाने ग्रामस्थ अक्षरशः बेभान झाले आहेत. आगोदरच हाताला काम नसल्याने भांबावून गेलेले मालसेलू येथील ग्रामस्थ सांडा उबडीसह पिण्याच्या पाण्याच्या शोधात रानोमळात भटकंती करत आहेत. हीच भटकंती थांबावी तसेच ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिता यावे म्हणून माजी आमदार रामराव वडकूते यांनी स्वतः आमदार विकास निधीतून बऱ्याच गावात जलशुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. यातील बरीच जलशुद्धीकरण केंद्रे ही गुत्तेदारांनी वेळेत उभारली आणि कार्यकर्त्यांनी सुरू देखील केली आहे. मालसेलू येथील जलशुद्धीकरण केंद्रही पूर्ण झालेले आहे. त्याचे, उद्घाटन माजी आमदार वडकूते यांच्या हस्ते केले जाणार होते, मात्र कोरोना संकटकाळ असल्याने उद्घाटन झालेच नाही. त्यामुळे, जलशुद्धीकरण केंद्र असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याप्रकरावर माजी आमदार वडकूते यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे, उद्घाटन न करताच मालसेलू येथील जलशुद्धीकरण केंद्रासह आमदार विकास निधीतून निर्मिलेल्या दुसऱ्या कोणत्याही गावातील जलशुद्धीकरण केंद्र बंद असेल तर ते वेळीच सुरू करावे, अशा सूचना माजी आमदार वडकुते यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
अधिच कोरोनाच्या महामारीने अडचणीत सापडलेले ग्रामस्थ पाण्यामुळे अडचणीत सापडायला नको. तसेच कोणत्याही ठिकाणचे पाणी पिल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सर्दी, पडसे या सारखे आजार उद्धभवले तर पुन्हा अडचण निर्माण होईल, त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात माजी आमदार वडकूते यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. शिवाय, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता आपल्या नेत्याची विनंती ऐकून किती दिवसात जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'या' गावांमध्ये दिले आहेत वाटर फिल्टर
माजी आमदार रामराव वडकूते यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील खांबाळा, नव्हल गव्हाण तर मालसेलू, बेलोरा, कडती येथे नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. कडती येथील शुद्धीकरणाचे कार्य पूर्ण झाले असून शुद्धीकरण केंद्र हे ग्रामपचांयतीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, बेलोरा येथील काम प्रगती पथावर आहे आणि मालसेलू येथील काम पूर्ण होऊन उद्घाटनाच्या हट्टा पाई बंद आहे.
हेही वाचा- गोठ्याला आग लागून एका जनावराचा होरपळून मृत्यू, तर पाच जनावरे गंभीर