हिंगोली - जिल्ह्यात प्रशासनाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते. त्यांना सुट्टी देखील देण्यात आली होती. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे प्रशासनाची चिंता थोडीफार कमी झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पुन्हा पाच जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिंगोलीकरांची पुन्हा चिंता वाढली आहे. आता 75 कोरोनाबाधित कायम आहेत.
हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये वसमत तालुक्यातील चार आणि सेनगाव तालुक्यातील एक अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालल्यामुळे ग्रामीण भागात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच हिंगोली जिल्ह्यात मुंबई-पुणे औरंगाबाद या ठिकाणावरून येणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने त्यांना शासकीय क्वारंटाईन तर कुणाला होम क्वारंटाईन राहण्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काही होम क्वारंटाईन हे आप- आपल्या शेतात वास्तव्यास राहत आहेत. मात्र हा कोरोना आता ग्रामीण भागात पसरल्यामुळे लहान कारणावरून ग्रामस्थ भांडत सुटले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील विविध आयसोलेशन वार्डमध्ये सध्या 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी येथील कोरोना सेंटरमध्ये आठ तर सेनगाव 12, हिंगोली 29, वसमत 11 आशा प्रकारे रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे आढळून येत नसल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
254 जणांचे अहवाल आहेत प्रलंबित
आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 2 हजार 173 व्यक्तींना दाखल केलेले आहे. त्यापैकी 1825 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर 1746 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला 420 व्यक्ती हे दाखल असून 254 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.
क्वारंटाईन निहाय थ्रोट स्वॅब अहवाल
वसमत येथील क्वारंटाईन सेंटर येथे 93 पैकी 52 निगेटिव्ह, 4 पॉझिटिव्ह तर 37 अहवाल हे प्रलंबित.
कळमनुरी येथे 20 पैकी 20 निगेटिव्ह,सेनगाव येथे 129 पैकी 108 निगेटिव्ह, 1 पॉझिटिव्ह, तर 20 प्रलंबित अहवाल हे प्रयोगशाळेकडे आहेत.