हिंगोली- संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात जीवाची जराही पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धावणारे नगर पालिकेचे कर्मचारी एकमेकांसाठी धावून आले आहेत. 77 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले एका दिवसाचे वेतन जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सफाई कर्मचारी यांना अल्प मदत म्हणून अन्न धान्याच्या किटचे वाटप केले जाणार आहे.
कोरोना संसर्गजन्य असल्याने हा आजार पसरू नये, म्हणून लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढल्याने हातावर पोट असलेल्या कुटुंबांना मोठ्या संकाटांना सामोरे जावे लागत आहे. अशात जिवाची पर्वा न करता चोख कर्तव्य बजावणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगार आणि आशा वर्करसाठी पालिकेचेच 77 अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. ते एका दिवसाचे वेतन जमा करत दिवस -रात्र राबणाऱ्या सफाई कर्मचारी, कोरोना टास्कमध्ये सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा वर्कर यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत.
या किटमध्ये 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो तेल, 1 किलो डाळ, 1 मिठाचा पुडा, 1 मिरची पुडा, 1 कपड्याचा साबण, 1 डेटॉल साबण या सर्व साहित्याचा समावेश आहे. 12 एप्रिल रोजी पहाटे हजेरीच्या वेळी सफाई कामगारांना या किटचे वाटप केले जाणार आहे. नंतर आशा वर्करलादेखील किट वितरित केले जाणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.
एका दिवसाचे वेतन जमा करून या भयंकर संकटात केलेल्या मदतीमुळे सीओ पाटील यांनी त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर शहरातील अनेक दानशूर व्यक्ती, संस्था ह्या बेघरांच्या व स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावून आल्याबद्दल त्यांचेदेखील पाटील यांनी आभार मानले.