हिंगोली - जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. या तपासणीत 43 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच दिवशी 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 506 वर पोहोचली आहे. आता 167 रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचे सामूहिक संक्रमण होण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अँटीजन टेस्ट करायला यापूर्वी प्रशासनाने नकार दिला होता. परंतु,आता कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या भागात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संशयितांची अँटीजन टेस्ट द्वारे तपासणी करण्यास सुरुवात झालीय.
हिंगोलीत 506 जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. तोफखाना भागात 121 पैकी 12, मंगळवारा भागात 95 पैकी 10, तलाबकट्टा 99 पैकी 4 अन आझम कॉलनी 94 पैकी 12 तर पेन्शनपुरा भागात 97 पैकी 5 असे एकूण 506 पैकी 43 जण तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह तर 463 हे निगेटिव्ह आढळले आहेत. यावरुन आता कोरोनाचे जिल्ह्यात संक्रमण वाढण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर मध्ये 11 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा आता चांगलाच हादरुन गेला आहे. प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. मात्र, अत्यवाश्यक सेवेतील कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने, सोबत सोबत काम करणाऱ्यांमध्ये तर अधिकच भीती निर्माण झाली आहे.
पाच जणांचा मृत्यू तर 13 जणांची प्रकृती गंभीर
प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या पैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरआरोग्य प्रशासन फार बारकाईने लक्ष ठेऊन आहे. कोरोनावर मात केलेल्या 7 जणांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे. यातील वसमत कोरोना केअर सेंटर मधील 6 अन् हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णलायातील 1 जणाचा समावेश आहे. आज घडीला 781 कोरोना संशयित विविध कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल असून 314 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत.