हिंगोली - जिल्ह्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. या ठिकाणी शौचालयाचे पाणी चक्क कुपनलिकेत मुरते आणि त्याच पाण्याने विद्यार्थ्यांना इच्छा नसतानाही आंघोळ करण्याची वेळ येत आहे. हा खळबळजनक प्रकार आज उघड झाला. अनेकदा तक्रारी करूनही प्राचार्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. कोणी तक्रारी करण्यासाठी पुढे आलेच, तर त्यांचे प्रात्यक्षिकाचे गुण कमी करण्याची भीतीही दाखवली जाते.
हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयामुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला. मात्र, या ठिकाणी निवासी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उच्च शिक्षणासाठी असलेला निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बकाल अवस्थेत जीवन जगावे लागत आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या वसतिगृहात १४० विद्यार्थी आहेत. मुलींच्या वसतिगृहात २४ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनाच अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. मुलांच्या वसतिगृहातील प्रत्येक चेंबर ब्लॉक झाले असून वॉटर हार्वेस्टिंगसाठी करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शौचालयाचे पाणी साचले आणि तेच पाणी त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होऊन बोरमध्ये उतरत आहे. मात्र, अद्यापही याची दखल घेतली गेलेली नाही.
उलट या सुविधांकडे दुर्लक्षच केले गेले. शिवाय परिसरात असलेले भोजनालयही दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेले आहे. परिसरात भयंकर दुर्गंधी सुटली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी निमूटपणे हा त्रास सहन करून घेत आहेत. संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्याचे तर टाळलेच. शिवाय वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. कधी नगरपालिकेकडे तर कधी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जात आहे.