हिंगोली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सर्वच स्तरातील आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या आहेत. विशेष करून यामध्ये नुकसान फळ बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संकटातही जिल्ह्यातील औंढा ते पिंपळदरी रोडवरील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने परिस्थितीवर मात केली आहे. येथील काही शेतकऱ्याने व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे आपल्या शेतमालाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवून द्राक्ष विक्री सुरू केली. त्यासाठी त्यांनी सेल्फ सर्व्हिसची भन्नाट संकल्पना वापरली आहे.
हिंगोली जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे, अशा मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये नागनाथ पाठक या शेतकऱ्याने द्राक्ष बाग फुलवलीय. सलग चार वर्षापासून ही बाग पिकवली जाते. मात्र, यावर्षी जरा चांगल्या प्रकारे बाग पिकलेली असतानाचा कोरोनाचे संकट येऊन ठेपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. मात्र, शेतकरी पाठक हे अजिबात खचून गेले नाहीत. आशा विदारक परिस्थितीत या शेतकऱ्यांने ही बाग थेट ग्राहकांकडे सोपवली आहे.
यामध्ये प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत द्राक्षांची विक्री केली जात आहे. शेतकरी मीना पाठक यांनी भावाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार ही बाग जोपासली आहे. यंदा या बागेत नजरेत भरेल असेल द्राक्ष पीक वाढले आहे. मात्र, कोरोनामुळे वाहतूक ठप्प झाली आणि बाजारपेठत माल पाठवणे अशक्य झाले. त्यातून त्यांनी मार्ग काढत द्राक्षे विक्रीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि 'थेट द्राक्ष बागेत या आणि हातांनी द्राक्षे तोडून विकत घेऊन जा' असे आवाहन केले.
आजवर बाजारातून द्राक्ष खरेदी करण्याच्या अनुभवापेक्षा बागेतून स्वत: हाताने द्राक्ष तोडून खरेदी करण्याच अनुभव ग्राहकांच्या पसंतीस उतरला आणि पाठक यांच्या शेताकडे ग्राहकांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात ही एकमेव बाग असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आवर्जून धाव घेत आहेत. शिवाय भाव देखील अतिशय कमी असल्याने ग्राहकांकडून द्राक्ष खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे फळ बागायतदार शेतकरी हा पूर्णपणे खचून गेला आहे. मात्र आपल्याकडे असलेल्या फळाची अफलातून फंडा आजमावून जर विक्री केली तर आपण निश्चितच दर्जेदार उत्पन्न मिळवू शकतो, हेच पाठक यांनी दाखवून दिले आहे.