हिंगोली - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोयाबीन कापणीला दोन दिवसांपासून चांगलीच गती आलली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी रात्रंदिवस सोयाबीन कापून घेण्याची कामे करत आहेत.
कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून हाताला काम नसलेल्या मजुरांना सोयाबीन कापणीची वाढीव मजुरी मिळत आहे. मजूरही रात्रंदिवस सोयाबीन कापणी करत आहेत. तर कापून टाकलेली सोयाबीन मळणीयंत्रातून काढून घेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांची घाई सुरू असल्याचे सध्या दिसत आहे.
कापणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी
जिल्ह्यांमध्ये साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रापैकी अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यावर्षी खरीप पेरणीच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ बऱ्यापैकी झाली. मात्र, शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन अक्षरश: सडून गेलेले आहे. तरीदेखील कसेबसे निसर्गाच्या अवकृपेनेतून वाचलेले सोयाबीन पारंपरिक पद्धतीने कापून घेण्याची कामे शेतकरी करत आहेत. वास्तविक पाहता यावर्षी सोयाबीनची वाढही चांगली झाली होती. त्यामुळे सोयाबीनची कापणी ही हार्वेस्टरने करण्याच्या तयारीत अनेक शेतकरी लागले होते. मात्र, शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
नुकसानग्रस्त भागात प्रशासनस्तरावर अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. अनेक भागामध्ये उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेले आहेत. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन कापण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
मजुरांना प्रति दिवस 300 ते 350 रुपये मजुरी-
मजुरांना प्रति दिवस 300 ते 350 रुपये मजुरी मिळत आहे. बऱ्याच मजुरांनी सोयाबीनच्या काढण्यासाठी गुत्ते घेतलेले आहे. निसर्गाचा समतोल बघून मजूर गतीने सोयाबीनची कापणी करत आहेत. मात्र ओले सोयाबीन असल्याने यंदा भावदेखील कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांनी वाटत आहे.