हिंगोली - कोरोनामुळे सर्वच जण हतबल झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे शेतातील माल हलवता येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असले तरीही एका शेतकऱ्याने उदारकता दाखवत हळद विकून कोरोनाच्या काळातही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दिलीप शिंदे (रा. गुगुळ पिंपरी ता. सेनगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज बंद पडले. यातच या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन शक्य ते प्रयत्न करत आहे. आपणही या महाराष्ट्राचे काही तरी देणं लागतो हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिंदेनीही आपल्या परीने मदत करण्याचे ठरविले. सोबतच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याला अन दिवसेंदिवस मदतीच्या ओघाच्या बातम्या पाहूनही शिंदे प्रवृत्त झाले. त्यानंतर, त्यांनी त्यांच्यापरीने शक्य ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. व ११ हजार रुपयांचा निधी आमदार संतोष बांगर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
खर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे हे नागरिकांसह प्रशासनाची झोप उडवत आहे. अशा विदारक परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चोख कर्तव्य बजावत असून, वेळोवेळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी सवांद साधत आहेत. घाबरलेल्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळात अडकून पडलेल्या शेतीमालाच्या वाहतुकीला परवानगी दिली होती. त्यामुळेच कुठे शेतकरी सावरू शकले असल्यानेच माझी मदत करण्याची इच्छा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. अजूनही ज्यांना शक्य होईल त्यांनी सरकारला आर्थिक मदत करावी. तर, ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरात बसून या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.