हिंगोली- यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर फार वाईट परिस्थिती येऊन ठेपली आहे. आशा विदारक परिस्थितीत शासनाचीही मदत मिळाली नाही, अन् शेत मालाला समाधानकारक भावही मिळाला नाही. मात्र, ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या लेकरांना दिवाळीचा आनंद लुटता येईना.., घरच्या परिस्थितीची जाणीव झाल्याने एका शेतकऱ्याच्या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे आपल्या वडिलाची व्यथा मांडली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक कोंडीत सापडलेल्या माझ्या वडिलांनी आम्हाला या आनंदाच्या क्षणी फटाके कपडेपण घेतले नसल्याची खंत पत्राद्वारे कळविली. तिचे हे पत्र सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाले. तिच्या या पत्रातील भावना समजून घेत खाकी वर्दीने शोध मोहीम राबविली, अन् तिचा शोध घेऊन मिठाईचे पाकीट, कपडे, फटाके आणि आर्थिक मदत करून त्या शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली. या मदतीने हे कुटुंबही भाराहून गेले आहे.
समीक्षाच्या पत्राने शेतकऱ्यांच्या अंधारातल्या दिवाळीवर प्रकाश-
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावातील सहावीत शिकणाऱ्या समीक्षा सावके या चिमुरडीच्या घरची परिस्थिती ही बेताचीच, दर वर्षीच शेतीच नुकसान, यंदा तर अतिवृष्टीने सर्व होत्याच नव्हते करून टाकलं. समीक्षाच्या वडिलांकडे असलेल्या कोकन दरी शिवारातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. क्विंटलने निघणारा माल अतिवृष्टीने किलोवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे माझ्या वडिलांकडे आमची दिवाळी साजरी करण्यासाठी अजिबात पैसे नाहीत अशी व्यथा तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे. एवढेच नव्हे तर कर्ज देखील माफ झाले नसल्याची आठवण तिने मुख्यमंत्री यांना करून दिली आहे. हे भावनिक पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाच्या वतीने या कुटुंबाचा शोध घेण्यात आला आहे.
समीक्षाने लिहलेल्या या पत्रातून शेतकऱ्यांची अवस्था कशी दयनीय झाले आहे. याचे वास्तवच समाजापुढे आले आहे. अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. पिकाच्या येणाऱ्या उत्पादनातून दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांने मुलांना दिलेली आश्वासने आणि मुलांनी दिवाळी साजरी करण्याची स्वप्ने सुरुवातील निसर्गाने आणि नंतर सरकारी व्यवस्थेने कशी अंधारात लोटली जात आहेत याचे हे पत्र उदाहरणच असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागली आहे.
गोरेगाव पोलिसांनी घेतली धाव-
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना, या शेतकरी कुटुंबात असलेल्या चिमुरडीच पत्र हे प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , उपाधीक्षक यतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोनि व्ही, डी. श्रीमनवार हे आपल्या कर्मचाऱ्यासह ताकतोडा या गावी पोहोचले. समीक्षासह तिच्या कुटुंबातील सर्वांची भेट घेऊन, हिंगोली पोलीस दलातर्फे मिठाईचे पाकीट, कपडे, फटाके, व एक पैशांचे बंद पाकीट समीक्षासह कुटुंब प्रमुख असलेल्या वडिलांकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या या भेटीने समीक्षाचे कुटुंब फार आनंदून गेले. अन समाधान व्यक्त केले. तर दुसरीकडे आपणही कोणाच्या मदतीसाठी धावून गेलो याच समाधान वाटल्याचे श्रीमनवार यांनी सांगितले.